Bjp Leader Sana Khan Murder Case: गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र युनिटच्या अल्पसंख्याक विंगच्या प्रमुख सना खान (Sana Khan) यांची त्यांच्या पतीने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला अटक केली आहे. सना अमितला भेटण्यासाठी नागपूरहून मध्यप्रदेशातील जबलपूरला गेली होती. दोन दिवसात ती घरी परतणार होती पण ती परत आली नाही.
अमित साहू दारूच्या तस्करीच्या व्यवसायात गुंतलेला होता. तो जबलपूरजवळ रस्त्याच्या कडेला भोजनालय चालवत होता. सना आणि अमितमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. चौकशीत अमितने सना खानच्या हत्येची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याने सनाला त्याच्याच घरात मारहाण केली. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर जबलपूरपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरण नदीत त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या खुलाशानंतर पोलीस आता अटक करण्यात आलेल्या संशयिताकडे गुन्ह्याच्या ठिकाणी कसून तपास करत होते. (हेही वाचा - Versova Crime: लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकराचा जीवघेणा हल्ला)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना आणि अमित यांचे लग्न झाले होते आणि त्यांच्यात अनेक दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. अमितला भेटण्यासाठी सना नागपूरहून जबलपूरला आली होती आणि भेटीदरम्यान त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर अमितने सनाच्या डोक्यात वार केल्याने तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचेही पोलिसांनी नमूद केले असून, ते या व्यक्तीचा शोध घेत आहेत. सध्या पोलीस अटक केलेल्या आरोपीची चौकशी करत आहेत. सना खान 2 ऑगस्ट रोजी नागपुरातून जबलपूरला आली आणि त्यानंतर बेपत्ता झाली. तिचा शोध घेण्यासाठी जबलपूरला पोहोचलेल्या तिच्या कुटुंबीयांनी प्रयत्न करूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.