पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या मगरमिठीत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकाला आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed Natural Gas) म्हणजेच सीएनजी (CNG) दरांनी धक्का दिला आहे. सीएनजी दरात प्रति किलो 2.58 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई शहरात (CNG, PNG Prices In Mumbai) सीएनजी गॅस प्रति किलो 51.98 दराने विकला जात आहे. तर पाइप्ड नॅचरल गॅस (Piped Natural Gas) म्हणजेच पीएनजी (PNG) दरात 0.55 रुपयांची वाढ झाली. हे नवे दर बुधवार (14 जुलै) पासून लागू झाले आहेत. सीएनजीच्या हावाल्याने आयएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आतापर्यंत 800,000 वाहनधारकांनी सीएनजीचा वापर केला. सीएनजीने जाहीर केलेल्या ताज्या दरपत्रकानुसार मुंबईत सीएनजी गॅस प्रति किलो 51.98 रुपये दराने विकला जात आहे. तर पीएनजी गॅस प्रति युनीट 30.40 रुपये दराने स्लॅबमध्ये तरमुंबई महानगर प्रदेशात (MMR) प्रति युनीट 36 रुपये दराने विकला जात आहे.
नवे गॅस दर हे मुंबई, ठाणे, कल्याण, वसई-विरार आणि नवी मुंबईमध्ये लागू असतील. या आधी एमएमआरमध्ये सीएनजी आणि एलपीजी गॅस दरात फेब्रुवारी 2021 मध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी सीएनजी दरातही प्रति किलो 1.50 रुपये आणि पीएनजी दरात 95 पैशांची वाढ करण्यात आली होती. (हेही वाचा, Petrol and Diesel Prices On July 13: भारतामध्ये आज इंधनदर स्थिर; पहा मुंबईसह महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल, डिझेल दर)
अलिकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. पेट्रोलने यापूर्वीच मुंबईत शतक ठोकले आहे आणि डिझेलही त्याच मार्गावर असल्याचे दिसते. सध्या पेट्रोल प्रति लिटर 107.20 रुपये दराने विकले जात आहे तर डिझेल प्रति लिटर 97.29 रुपयांवर आहे.
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या प्रवक्त्या नीरा अस्थाना-फाटे म्हणाले की, गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाच्या अंशतः भागांची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ केली गेली आहे.