MVA Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बैठकांचा धडाका, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: | Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असले तरी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे. मंत्रिमंडळ बैठकांचा त्यांनी धडाकाच लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक (MVA Cabinet Meeting Decision) पार पडली. उद्याही मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली.

मंत्रिमंडळ बैठकीत प्रामुख्याने राज्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात पावसाळा सुरु झाला तरी आवश्यकतेप्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे संभाव्य संकटाला तोंड द्यावे लागले तर काय उपाययोजना असावी याबाबत या वेळी चर्चा झाली.पाठिमागच्या वर्षी राज्यात सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत 134 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाठिमागच्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा एकूण खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रच पेरिताखाली आले आहे. (हेही वाचा, Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती, घ्या जाणून)

सुभाष देसाई घेणार आढावा

यंदा पावसाचा एकूण रागरंग पाहता पुरेशा पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सध्या नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी उद्या (29 जून) संवाद साधून आढावा घेणार आहेत. या आढाव्यात आगामी काळात पाऊस पडलाच नाही तर पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाईल, याबाबत चर्चा केली जाईल.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

ऐन पावसाळ्यातही राज्यात जवळपास 610 गावे आणि 1266 वाड्या-वस्त्यांना 496 टँकर्स आजघडीला पाणीपुरवठा करत आहे. यात 66 शासकीय तर 430 खासगी टँकर्सचा समावेश आहे. पावसाळा सुरु झाल्यावर टँकर्सची संख्या तुलनेत कमी झाली खरी. पण, पावसाने हुलकावणी दिल्याने ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील धरणांमध्ये सध्यास्थितीत उपलब्ध असलेला पाणिसाठा 21.82 इतका आहे. विभागावार पाणीसाठ्याबाबत बोलायचे तर अमरावती विभागात 33.80%, मराठवाडा 27.10%, कोकण 34.43%, नागपूर 26.81%, नाशिक20.02% तर पुणे विभागात 12.35% पाणीसाठी उपलब्ध आहे.