मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आता सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहात नव्हते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही ते उपस्थित राहिले नव्हते. मात्र, आता ते जवळपास अडीच महिन्यांनंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे पार पडणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 12 नोव्हेंबरला झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच ते जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर काहीकाळ रुग्णालयात उपचार घेतल्यावर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून ऑनलाईन बैठका, कार्यक्रम वगळता इतर कोणत्याच बैठका, कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाहीरपणे उपस्थित राहिले नाहीत. तसेच, मोजके लोक वगळता कोणालाच भेटलेही नाही. या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका केली होती. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री गैरहजर, भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यावर टीका)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सतर्क झाली आहे. त्या दृष्टीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे जंगी आयोजन मुंबई महापालिकेने केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती विचारात घेऊन पालिकेने विशेष दक्षताही घेतल्याचे सांगितले जात आहे.