CM Uddhav Thackeray यांच्यावर दाखल होणार गुन्हा? Atul Bhatkhalkar यांनी केली पोलिसांत तक्रार, जाणून घ्या प्रकरण
Atul Bhatkhalkar & CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook & PTI)

मुंबईच्या साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर (Saki Naka Rape Case) महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी याबाबत पोलिसांसोबत बैठक घेतली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव यांनी परप्रांतीय लोकांचा तपशील मागितला आहे. या व्यतिरिक्त, मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात परप्रांतातून येणाऱ्यांनी नोंदणी केली पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजपने हल्ला चढवला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, आपण मुख्यमंत्री उद्धव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर म्हणाले, ‘बलात्काऱ्यांना कोणतीही जात, धर्म आणि प्रांत नसतो. अशा परिस्थितीत ते महाराष्ट्रात येतात आणि बलात्कार करतात, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विधान दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे, दोन समाजांमध्ये भिती निर्माण करणारे आहे. त्यामुळेच आज आम्ही समता नगर पोलीस ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कलम 153 अ अंतर्गत खटला दाखल करावा अशी मागणी केली आहे.

भातखळकर पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे कोण आहेत? त्यांच्यावर कोणते आरोप आहेत? जेव्हा एक महिला त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते, तेव्हा तिला दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यात येते. संजय राठोड प्रकरणाचे काय झाले? शिवसेनेचे शाखा प्रमुख धनंजय गावडे यांच्यावरही बलात्काराचा आरोप आहे, हे लोक परप्रांतीय आहेत का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी.’

पुढे ते म्हणाले की, ‘याबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. मला पोलिसांकडून 4 दिवसांत लेखी उत्तर हवे आहे. जर का त्यांनी याबाबत एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला तर मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावेन.’ (हेही वाचा: Nirbhaya Squad: मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'निर्भया पथका'ची स्थापना, महिला सुरक्षतेसाठी उचलले महत्वाचे पाऊल)

दरम्यान, काळाच्या बैठकीमध्ये, ‘माता-भगिनींची टिंगल-टवाळी, त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.