CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती, त्यानिमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसैनिकांना पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, पक्षाचे महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व बळकट करण्याचा आणि शेवटी दिल्लीत सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार करून काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुरते मर्यादित न राहता सर्वच निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांनी एकच संकल्प आणि लढण्याची भावना दाखवावी.

विजय-पराजय झाला तरी शिवसैनिकांनी राज्यातील बँका, स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुका लढविण्याकडे समान लक्ष दिले पाहिजे. याशिवाय, सध्या गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आपले उमेदवार उभे करणारा पक्ष भविष्यात इतर राज्यांमध्येही निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले. एक दिवस इतर राज्यांतही शिवसेना विजयी होईल आणि दिल्लीतही सत्ता मिळवेल,  असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

मणक्याच्या दुखापतीतून सावरलेल्या ठाकरे यांनी शिवसैनिकांनी बँका आणि स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, कारण मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसची त्यामध्ये सरशी झाल्याची दिसली. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना अशा निवडणुका लढवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनुकरण करण्यास सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती हे खरे असले तरी या वर्षांत त्यांनी विक्रमी जागा जिंकल्या आहेत.

ज्यांना विश्वासघात करायचा आहे त्यांनी पक्ष सोडावा आणि इतरांनी आत्मविश्वासाने आणि निष्काळजीपणा न करता सर्व निवडणुका लढवाव्यात, असे ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपच्या ‘वापरा आणि फेका’ या धोरणावरही टीका केली आणि राष्ट्रीय स्तरावर एनडीए अस्तित्वात नाही असे सांगितले. ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. भाजप सोडणे म्हणजे हिंदुत्व सोडणे असा नाही. भाजपचे हिंदुत्व हे नव हिंदुत्व आहे जे सत्ता मिळविण्यासाठी आचरणात आणले जाते,’ असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, ‘सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपले हिंदुत्व नाही.’ (हेही वाचा: 'पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही, पाल्यासाठी जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या'- Minister Aaditya Thackeray)

महाराष्ट्रात सत्तेच्या समान वाटपाचे निवडणुकीपूर्वीचे आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांनी भाजपवर टीका केली आणि त्यामुळे पक्षाने आपले संबंध तोडले आणि सत्ता स्थापन करण्यासाठी नवीन मित्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शिवसेनेने राज्य निवडणुकीत एकट्याने जाण्याच्या आव्हानालाही ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले की पक्ष त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. यासोबत घरातून काम करण्याच्या भाजपच्या वारंवार होत असलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी लवकरच राज्यव्यापी दौरे करणार असल्याची घोषणा केली.