Eknath Khadse यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावर CM Uddhav Thackeray यांची पहिली प्रतिक्रीया; पहा काय म्हणाले
CM Uddhav Thackeray and Eknath Khadse (Photo Credits: PTI)

भाजपचे (BJP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्षाला रामराम ठोकला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार आहेत. यावरुन सर्वत्र चर्चा रंगत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रीया नोंदवली आहे. "एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यांचे महाविकास आघाडीत स्वागत आहे," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश होईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थोड्याच वेळापूर्वी दिली. दरम्यान, आज सकाळापासून एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. (Eknath Khadse To Join NCP: एकनाथ खडसे 23 ऑक्टोबरला एनसीपी मध्ये प्रवेश करणार; जयंत पाटील यांची माहिती)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ खडसे भाजपवर नाराज होते. सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करणारे खडसे यांनी राजीनाम्यानंतरही केवळ देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याने पक्ष सोडत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं कळताच समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर खडसे लगेचच मंत्री होण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे. (Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांना भाजपकडून शुभेच्छा)

रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, केशव उपाध्ये यांसारख्या भाजप नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसंच खडसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

1987 मध्ये एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आणि त्यानंतर सलग 6 वेळा त्यांची मुक्ताईनगर विधानसभेसाठी निवड झाली आहे. 1995 साली ते जलसंपदा मंत्री होते. तर 2010 मध्ये त्यांनी विरोध पक्षनेते म्हणून काम पाहिले.