राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रावर महापुराचे (Maharashtra Floods) संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. विविध ठिकाणी पाऊस व त्यामुळे दरड कोसळल्याने 100 हून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. घरांचे, शेतीचे, व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शोकाकुल असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस (CM Uddhav Thackeray Birthday) न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात. दरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले. मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. (हेही वाचा: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 लाख लोकांना सोडावे लागले घर)
उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडेलत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.