Maharashtra Monsoon 2019: 'मुंबईकरांनो पुढील दोन तीन दिवस धोक्याचे, सांभाळून राहा' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: ANI)

राज्यात मागील आठवड्यापासून पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे, अनेक ठिकाणी रस्ते, शाळा, इमारती, इतकेच नव्हे तर हॉस्पिटल मध्ये सुद्धा पाणी साचून मुंबईकरांची वाईट अवस्था झाल्याचे वृत्त सातत्याने कानी येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadvnais) यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दोन-तीन दिवस मुंबईला पावसाचा धोका आहे. पावसाचा सामना करण्यासाठी सरकार आणि महापालिका (BMC) प्रशासनातील अधिकारी अॅलर्टवर आहेत, मात्र नागरिकांनी सुद्धा यावेळी दक्षता बाळगावी असं त्यांनी सांगितलं आहे. मुंबईत पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजकारण करण्यापेक्षा नागरिकांना दिलासा देणं महत्वाचं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5  लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय महापालिकेकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करणार आहोत यातून मालाडच्या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. Mumbai Rains: मालाड येथील पिंपरीपाडा परिसरात भिंत कोसळून 18 ठार; जखमींची विचारपूस करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी रुग्णालयात

देवेंद्र फडणवीस ट्विट

मुख्यमंत्र्यांनी आज, मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. गेल्या तीन-चार दिवसांत प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणी साचलं. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणचं साचलेलं पाणी उपसलं आहे. तर अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पावसाचे पाणी उपसण्यासाठी पालिकेचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत संपूर्ण महिनाभराचा पाऊस पडल्याने कामाचा दबाव वाढत आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान हवामान विभागानंही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ज्यानुसार शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढील दोन-तीन दिवस मुंबईला पावसाचा धोका आहे. त्यामुळं नागरिकांनीही सतर्कता बाळगली पाहिजे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.