Anandrao Adsul | (Photo Credits-Facebook)

शिवसेना (Shiv Sena) नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना सक्तवसुली संचालयाने नोटीस बजावली. या नोटीशीनुसार आनंदराव अडसूळ हे आज (मंगळवार, 9 फेब्रुवारी) सक्तवसुली संचलनालयात हजर झाले. या वेळी ईडी अधिकाऱ्यांकडून त्यांची प्रदीर्घ काळ चौकशी झाली. सिटी को-ऑप बँक घोटाळा (City Co Op Bank Scam) प्रकरणात आनंदराव अडसूळ यांची चौकशी झाल्याचे वृत्त आहे. वडनेरा येथील आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आरोप केला होता की अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटाळा केला आहे. त्यांच्या आरोपानंतर अडसूळ चौकशीच्या फेऱ्यात उभे राहिले आहेत.

काय आहे प्रकरण?

बडनेराचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी या दिवशी आरोप केला होता. या आरोपात सीटी को ऑप बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच, या आरोपाबाबतची कागदपत्रे दाखल करण्यासाठी रवी राणा हे ईडी कार्यालयातही पोहोचले होते. (हेही वाचा, शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीचं श्राद्धे घातले; संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार)

रवी राणा यांचे आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप

दरम्यान, सिटी को ऑप बँकेच्या एकूण 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेच्या खातेधारकांची संख्याही मोठी असल्याचे सांगितले जाते. अशी बँक कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली. ही बँक बुडण्यासाठी अनधिकृतरित्या केलेले कर्जवाटप हेच कारण असल्याचा रवी राणा यांचा आरोप आहे. अनधिकृत कर्जांसोबतच अडसूळ यांनी बँकेची मालमत्ता भाडेतत्त्वावरही दिली होती, असा आरोप राणा यांनी केला आहे.

आनंदराव अडसूळ हे शिवसेना पक्षाचे जेष्ठ आणि जुनेजाणते नेते आहेत. 1996 पासून अमरावती लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर सलग निवडूण आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नवनीत राणा यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी एक अशी अडसूळ यांची ओळख आहे.