शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांचे जिवंतपणीचं श्राद्धे घातले; संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार
Sanjay Raut, Amit Shah (PC - PTI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कोकण दौऱ्यावर असताना शिवसेनेवर टीका केली होती. आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांचे जिवंतपणीच श्राद्धे घातलं, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. देशातील सर्व प्रश्नांचा निचरा झाल्यामुळे गृहमंत्री अमित शहा हे रविवारी कोकण प्रांतात पायधूळ झाडून गेले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र भाजपातील एकजात सर्व मूळ पुरुष तसेच बाटगे मंडळ उपस्थित होते. अमितभाई हे बऱ्याच कालखंडानंतर महाराष्ट्रात अवतरल्याने ते काय बोलतात, काय करतात याकडे लोकांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे अमित शहा यांनी धुरळा उडवला, पण त्यांचे विमान पुन्हा दिल्लीत उतरण्याआधीच धुरळा खाली बसला आहे.

शहा नवीन असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी तोच कोळसा उगाळून काय साधले? त्यांचा नेहमीचा यशस्वी मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने आले आहे, सरकार तीनचाकी आहे वगैरे वगैरे. बंद खोलीत आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. दुसरे म्हणजे आपण जे करतो ते ‘डंके की चोट’पर करतो. बंद खोलीत कधीच काही करत नाही अशा गजाली त्यांनी कोकणात येऊन केल्या. त्यामुळे कुणाचे मनोरंजन झाले असेल तर माहीत नाही, पण महाराष्ट्राने या गजाली गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. बरे, बंद खोलीचे रहस्य याआधी भाजपा पुढाऱ्यांनी अनेकदा मांडले आहे. अनेक ‘बैठय़ा’ मुलाखतीत शहा यांनी स्पष्ट केले आहे की, ”बंद खोलीत काय घडले हे बाहेर सांगणे हा आपला संस्कार नाही.” मग आता कोकणच्या ‘जगबुडी’ नदीत त्या संस्काराचे विसर्जन का झाले? हे सर्व लोक या पद्धतीने ‘उचकले’ आहेत याचे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे वैफल्य! भाजपाच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (वाचा - Ajit Pawar, Bacchu Kadu Conflict: अजित पवार , बच्चू कडू यांच्यात निधीवाटपावरुन वाद; अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीत नाराजी)

अमित शहा यांच्यात व शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते तेसुद्धा ‘डंके की चोट’पर करते. तसे नसते तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती. आम्ही लपूनछपून काळोखात काही करत नाही, असे कोकणात सांगितले गेले. त्यावर कोकणातली भुतेही हसून नाचली असतील. फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतोय, पण ठीक आहे. धुरळा उडवायचा म्हटल्यावर या अशा उडवाउडवीकडे दुर्लक्ष करायला हवं, अशी खोचक टीपण्णीही राऊत यांनी भाजप सरकारवर केली आहे.

अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी अग्रलेखातून व्यक्त केला आहे.