दिवाळीच्या मुहूर्तावर आज सिडको कडून घरांची सोडत (CIDCO House Lottery) जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणार्यांसाठी ही खूषखबर आहे. आजच्या दिवशी सिडको कडून 7849 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. दरम्यान ही घरं उलवे नोड मधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व या भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हा प्रकल्प 'परिवहन केंद्रित विकास' या संकल्पनेवर आधारित आहे. 25 ऑक्टोबर पासून या प्रकल्पासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर 19 जानेवारी 2023 दिवशी या घरांसाठीचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे.
सिडको कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही घरं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ असणार आहेत. गृहसंकुलाच्या परिसरातच शाळा, महाविद्यालयं आणि हॉस्पिटल अशा मूलभूत सुविधा उपलब्ध असणार आहेत.
सिडको सोडती मधील महत्त्वाच्या तारखा
सिडकोच्या या दिवाळी विशेष जाहीर करण्यात हाऊस लॉटरी मध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी 25 ऑक्टोबर ते 22 डिसेंबर 2022 करता येणार आहे. तर अर्ज सादर करण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 23 जानेवारी पर्यंतचा वेळ असणार आहे. या घरांसाठीच्या सोडतीचा निकाल 19 जानेवारी2023 दिवशी जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. lottery.cidcoindia.com या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हांला ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाचे शुल्क भरण्यासाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर व बामणडोंगरी येथे ७८४९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!#YourCIDCOHome pic.twitter.com/Z1XhUYYC94
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) October 24, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सिडको’ च्या नवीन महागृहनिर्माण योजनेची घोषणा.
नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी व खारकोपर येथे परवडणाऱ्या दरात ७ हजार ८४९ सदनिका होणार उपलब्ध. या सोडतीचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन pic.twitter.com/mP3XHScq0R
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 24, 2022
दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडा कडूनही घरांची सोडत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र यंदा त्यांचा हा मुहूर्त हुकण्याची चर्चा आहे. अद्याप म्हाडा कडून घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली नाही.