
पुण्यात पिंपरी चिंचवड मनपा च्या जलतरण तलावामध्ये आज सकाळी क्लोरिन गळती (Chorine Gas Leakage) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी (Kasarwadi) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावातील आहे. अचानक क्लोरीन गॅस लिक झाल्याने अनेकांना त्रास झाला. टॅंक मध्ये असलेल्या 20-22 जणांना यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आजुबाजूच्या परिसरामध्येही क्लोरिन गॅस पसरल्याने काही मीटर पर्यंत नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, खोकल्याचा त्रास झाला. यामुळे काही वेळ कासारवाडी भागात स्विमिंग पूल जवळचा भाग वाहतूकीसाठीही बंद होता.
सकाळी 8 च्या सुमाराची घटना असून क्लोरिन गॅस गळती झाल्याचं पाहून तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. टॅंक मध्ये पोहायला आलेल्यांना 22 पैकी 11 जणांना त्रास जाणवू लागल्याने नजिकच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. टॅंक पासून 500 मीटर आजूबाजूच्या भागातील लोकांनाही त्रास जाणवू लागला होता.
काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये पालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये मगरीचं पिल्लू आढळलं होतं. दादर भागातील ही घटना होती. सुदैवाने टॅंक सुरू करण्यापूर्वी तपासणीच्या वेळेस ते दिसून आल्याने पुढील अनर्थ टळला.