Maharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेली. तर, तर काही ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसेच पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरू होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

'नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पुराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारी, व्यावसायिकांची माहिती एकत्र करा, त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता

राज्यात आठवड्याभरापासून विविध भागात सुरु असलेल्या पावसाने बुधवारपासून अधिक जोर धरला. गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाने थैमान घातले. परिणामी, सखोल भागात पाणी साचले. घर, बाजारापेठा पाण्याखाली गेल्या. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर, दुसरीकडे अतिवृष्टीमुळे डोंगराचे दगड चिखल माती निसरडी झाली. ज्यामुळे महाराष्ट्रात मोठी जीवितहानी झाली. तसेच अनेकांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावा लागले आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना 10 हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजाराचे धान्य मदत रुपात देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.