Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज शालेय शिक्षण विभागाचा (School Education Department) आढावा घेतला. यावेळी त्यांनी ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिकही पाहिले. तसेच 11 वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो? त्याचे प्रात्यक्षिक पाहिले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दरम्यान, येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सुचना मागवाव्यात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. (हेही वाचा - MHT CET 2020: कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढील सूचनेपर्यंत Common Entrance Test संबंधित सर्व परीक्षांना स्थगिती, उदय सामंत यांची माहिती)

दहावी आणि बारावीसाठी जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्वावर दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी अशा स्वतंत्र 5 वाहिन्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय दूरदर्शनवर दिवसाला 4 ते 5 तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन असल्याचंही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, दहावी-बारावीचा निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु आहे. 15 जुलै पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावणार आहे. दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहितीदेखील शालेय शिक्षण विभागाने यावेळी दिली आहे.