CM Uddhav Thackeray signs MoU of 15 companies (PC - DGIPR)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यात 1 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सोमवारी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर (Memorandum of Understanding) स्वाक्षरी करण्यात आल्या. 15 कंपन्यांमार्फत राज्यात जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणूकीमुळे राज्यातील 23,182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितचं समाधानाची बाब आहे. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केलं.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, एफडीआय शेरपा प्रधान सचिव भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. (हेही वाचा -  MLA Gopichand Padalkar filed Petition:आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल, विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक अवैध ठरविण्याची मागणी)

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी भविष्यात 1 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरचं 1 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वासदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

युके, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅनुफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल, असा विश्वासही देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.