Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

शेतकरी (Farmers) मातीतून सोनं पिकवतो. त्याचा सन्मान झाला पाहिजे. सरकार आपलं आहे. हा सन्मान नक्की होईल. शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याच्या समस्यांची सोडवणूक झाली पोहीजे. शेतकऱ्याला दिवसा वीज (Electricity) मिळायला हवी. याची सरकारला कल्पना आहे. त्या विषयावर काम सुरु आहे, असे सांगत महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. ते जळगाव येथील एका कृषी प्रदर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जळगाव येथे बोलत होते.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांनी प्रयोगशील असले पाहिजे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभा आहे. त्यामुळे आपण शेतीमध्ये प्रयोग करायला अजिबात घाबरु नका. विचार आणि कृतीची सांगड घातली तर, काहीच अवघड नाही. त्यामुळे थोरामोठ्यांनी लिहून ठेवलेले केवळ पुस्तकात असून चालत नाही. ते वाचल्यावर प्रत्यक्षात आणायलाही हवे. दुसरा कोणीतरी ते करेल याची वाट बघत बसण्यात काहीच हाशील नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत सांगितले. (हेही वाचा, भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवार यांची नाराजी म्हणाले 'या विषयात राज्याने केंद्राला पाठिंबा देणे योग्य नाही')

दरम्यान, देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या वेगळी हवा आहे. ही हवा येत राहते जात राहते. मात्र, राज्यातील कृषी क्षेत्रातील हवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू द्या. महाराष्ट्राच्या शेतीत अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेन. तसेच, नवनविन प्रयोग, तंत्रज्ञान आणत असताना शेतकऱ्यांचाही सरकारला पाठिंबा मिळावा, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.