अखेर ठरलं! महाविकाआघाडी सरकारचे खातेपाटप उद्या; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडूनही हिरवा कंदील
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: twitter)

महाविकाआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या मंत्रिमंडळ खातेवाटपास अखेर उद्याचा (4 जानेवारी 2020) मुहूर्त मिळाला आहे. या खातेवाटपास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही हिरवा कंदील दर्शवला असून, त्याबाबतचा तपशील काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना दिला असल्याचे वृत्त आहे. राज्यात नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडल्यावर अखेर महाविकाआघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर प्रदीर्घ काळ लोटल्यावर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. तेव्हापासून खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सरकारचे गाडे अडले होते. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरत होते. मात्र, अखेर या मंत्र्यांना खाते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार महाविकाआघाडीसरकारचे खातेवाटप उद्या होणार असून,ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तास दुजोराही दिला आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या खात्यांवरुन खातेवाटपाचे महाविकाआघाडी सरकारचे गाडे आढले होते ती कृषी आणि परिवहन ही दोन्ही खाती शिवसेना पक्षाकडेच राहणार आहेत. तर त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडे प्रत्येकी दोन खाती अतिरिक्त दिली जाणार आहेत. (हेही वाचा, तब्बल चार तास खलबतं केल्यावर मुहूर्त ठरला, अजीत पवार म्हणतात 'उद्या होणार मंत्रिमंडळ खातेवाटप')

राजकीय सूत्रांची माहिती अशी की, कृषी आणि परिवहन ही दोन्ही खाती शिवसेनेकडे राहणार आहेत. तर, त्या बदल्यात बंदरे-खार जमीनी आणि सांस्कृतीक ही दोन खाती राष्ट्रीय काँग्रेस तर माजी सैनिक कल्याण आणि युवक कल्याण अशी दोन अतिरिक्त खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिणीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, आम्हाला खातेवाटप करण्यास काहीसा विलंब झाला हे खरे आहे. परंतू, विलंब झाला असला तरी हे खातेवापट अंतिम असण्याच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे पाऊल टाकले. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेसाठी ही आणखी एक महत्त्वाची घटना आहे. अद्यापही काही मुद्द्यांवर चर्चा सुरु असून, त्यावर उद्या सकाळपर्यंत तोडगा काढण्यात येईल असेही जयंत पाटील म्हणाले. दुसऱ्या बाजूला महाविकाआघाडी सरकाचे खातेवाटप उद्धव ठाकरे उद्या दुपारी करतील, असे सुतोवाचही पाटील यांनी केले.