कोकणवासीयांच्या सेवेत आजपासून हवाई प्रवास रुजु होत आहे. अवघ्या कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या चिपी विमानतळाचे (Chipi Airport Inauguration) आज लोकार्पण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), केंद्रीय हवाईवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय लघु व सुक्ष्म विकासमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. अनेकदा जाहीर भाषणांतूनही त्यांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केले आहेत. राज्यातील जनतेला हा सामना नवा नाही. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर प्रथमच हे दोन्ही नेते एका मंचावर येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साधारण 20 वर्षांपूर्वी चिपी विमानतळाचे काम सुरु झाले. प्रदीर्घ काळानंतर आता कुठे या विमातळाच्या प्रत्यक्ष वापराचा मुहूर्त लाभत आहे. या विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही काहीसे राजकीय वातावरण तापले होते. चिपी विमानतळ कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावण्याची आवश्यकता नाही, असे विधान नारायण राणे यांनी केले होते. दरम्यान, नारायण राणे यांनी नंतर मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांनी पाहुणे म्हणून कार्यक्रमाला यावे अशी भूमिका प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांना भेटणार का? काही बोलणार का? त्यांच्या समर्थकांच्या भूमिका काय आणि कशा असतील? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (हेही वाचा, Mumbai - Sindhudurg Direct Flight: 9 ऑक्टोबर पासून Alliance Air कडून मुंबई-सिंधुदुर्गदरम्यान थेट विमानसेवा; इथे पहा फ्लाईट शेड्युल, तिकिटाची किंमत)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रोटोकॉलप्रमाणे राज्य, केंद्राचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळींना निमंत्रण असणार आहे. चिपी विमानतळावरुन ठाकरे आणि राणे समर्थकांनी श्रेयवादाची लढाई जोरदार सुरु केली आहे. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुरु केली आहे.