Eknath Shinde (Photo Credit- Twitter/ANI)

Raigad Landslide: राज्यातील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi) गावात नुकत्याच झालेल्या भूस्खलनात आई-वडील दोघे गमावलेल्या मुलांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknash Shinde) दत्तक घेणार आहेत. इर्शाळवाडी दरड कोसळून अनेक मुलांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालक बनण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे की 2 ते 14 वर्षे वयोगटातील या अनाथ मुलांची काळजी श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून (Shrikant Shinde Foundation) घेतली जाईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण व इतर सर्व खर्च केला जाणार आहे. प्रत्येक मुलासाठी त्यांच्या शिक्षणासाठी एक एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले. (हेही वाचा - Irshalwadi Landslide: मृतांची संख्या 22 वर , NDRF ची शोधमोहीम सुरुच)

दरम्यान, इर्शालवाडी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) शनिवारी रायगडमधील भूस्खलनग्रस्त इर्शालवाडी येथे शोध आणि बचाव कार्य सुरू ठेवले. एनडीआरएफची एक टीम आज सकाळी घटनास्थळी पोहोचली. आज नंतर आणखी टीम शोध मोहिमेत सामील होण्याची अपेक्षा आहे.

तथापी, बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईपासून अंदाजे 80 किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोंगर उतारावर वसलेल्या आदिवासी गावात दरड कोसळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. शाह म्हणाले की, बचाव कार्य हाताळण्यासाठी चार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.