Eknath Shinde-Gajanan Kirtikar Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
Eknath Shinde-Gajanan Kirtikar | (Photo Credit - Twitter)

Eknath Shinde Meets Gajanan Kirtikar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आतापर्यंत असलेले शिवसेना (Shiv Sena) खासदार गजानन किर्तीकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर, राजकीय वर्तुळातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी किर्तीकर यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. गजानन किर्तीकर हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. मात्र, या भेटीमुळे आता किर्तिकरही शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

खासदार गजानन किर्तीकर हे पाठिमागील काही दिवसांपासून प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त आहेत. त्यामुळे ते सध्या घरीच असतात. दरम्यान, शिवसेनेमध्ये आजपर्यंत सर्वात मोठा भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे हा भुकंप आला आहे. हा भूकंप इतका मोठा आहे की, शिवसेना नेमकी कोणाची? हाच सवाल उत्पन्न झाला आहे. विधिमंडळ आणि संसदेतील शिवसेना दोन गटात विभागली आहे. त्यामुळे काही मोजकेच आणि महत्त्वाचे चेहरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेणे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिंदे गटात सामील झालेले खासदार

राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे

ट्विट

धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांची संख्या 18 इतकी आहे. त्यापैकी 12 खासदार शिंदे गटात सामिल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही मोजकेच खासदार आहेत. त्यामुळे त्या खासदारांपैकीही काही खासदार गळाला लावण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.