राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (20 नोव्हेंबर) सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला राज्यातील विविध प्रश्नांवरुन घेरण्यासाठी विरोधी पक्षांची एक बैठक मुंबईत आज (रविवार, 18 नोव्हेंबर) पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, या पत्रकार परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा अधिक चर्चा तिथे लावलेल्या एका पोस्टरचीच सुरु झाली आहे. हे पोस्टर अभिनेता अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या पोस्टरची कॉपी आहे. पण, या पोस्टरवर झळकत असलेले चेहरे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत. त्यामुळे हे पोस्टर चर्चेचा विषय बनले आहे.
पोस्टरवर 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' असा उल्लेख असून, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे ठग असे संबोधले गेले आहे. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत बॅकग्राऊंडलाच हे पोस्टर झळकत होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनही विरोधकांपेक्षा या पोस्टरकडेच लक्ष वेधले. पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात तलवार देण्यात आली आहे. विरोधकांच्या या पोस्टरबाजीस सत्ताधारी कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुतकेचे असरणार आहे. (हेही वाचा, समीक्षकांनी नाकारूनही 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पार केला 100 करोडचा पल्ला)
दरम्यान, महाराष्ट्रात यंदाची दिवाळी पोस्टर आणि व्यंगचित्र यूद्धानेच (कार्टून वॉर) गाजली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त व्यंगचित्रांची एक मालिकाच सादर केली. यात स्थानिक प्रश्नांपासून राष्ट्रीय मुद्द्यांवरही सरकारला लक्ष करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, देवेंद्र फडणवीस ते उद्धव ठाकरे अशा सर्वांनाच राज यांनी कुंचल्यातून फटकारले.