समीक्षकांनी नाकारूनही 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पार केला 100 करोडचा पल्ला
आमिर खान आणि अमिताभ बच्चन (Photo Credits: Twitter)

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आमीर खानचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या गुरुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल फार उत्सुकता निर्माण झाली होती. ट्रेलर पाहून अनेकांनी हा चित्रपट ‘कॉपी’ केला गेला असल्याचे सांगितले , मात्र तरीही आमीरचे चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच समीक्षकांनी या चित्रपटाची खिल्ली उडवायला सुरुवात केली. अनेकांनी समीक्षा लिहून, व्हिडीओ तयार करून चित्रपट किती वाईट आहे, कोणकोणत्या बाबतील कॉपी केला गेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हळू हळू या चित्रपटाची बॅड माऊथ पब्लिसिटी व्हायला सुरुवात झाली. मात्र आता या सर्वांच्या नाकावर टिच्चून हा चित्रपट 100 करोड रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करण्यात यशस्वी झाला आहे.

आमिर व अमिताभच्या ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ने निराशा केली, ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’चा बार फुसका निघाला अशा शब्दात समीक्षक या चित्रपटावर तुटून पडले होते. मात्र तरी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पहिल्याच दिवशी तब्बल 52.75 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर तीन दिवसांमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुस-या दिवशी चित्रपटाने 28.25 कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी चित्रपटात 22.75 कोटींचा व्यवसाय केला. हिंदी भाषेतील ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ने तीन दिवसांत एकूण 101.75 कोटी कमावले; तर तामिळ, तेलगू या भाषेतही या चित्रपटाने 105 कोटींचा व्यवसाय केला.

या चित्रपटाद्वारे आमीर खान आणि अमिताभ बच्चन प्रथमच एकत्र पाहायला मिळाले. यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट तब्बल पाच हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित केला. हिंदीसोबतच तेलुगु आणि तमिळ अशा भाषांतही हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तयार करण्यावर जितकी मेहनत घेतली गेली तितकीच या चित्रपटाच्या प्रमोशनवर देखील घेतली गेली. गेले कित्येक दिवस चित्रपटाचे जोरदार मार्केटिंग चालु होते. या सर्व गोष्टींचा फायदा या चित्रपटाला झाला आणि अल्पावधीत बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने समाधानकारक कमाई केली. आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट अजून किती कमाई करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.