Amboli Ghat | (File Image)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील अंबोली घाटात 300 फूट खोल दरीत कोसळून छत्तीसगड रिझर्व पोलीस (Chhattisgarh Police) दलात कर्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मीतिलेस पॅकेरा असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मीतिलेस पॅकेरा हे कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Election) च्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर आले होते. या वेळी सुट्टी मिळाल्याने ते पर्यटनासाठी म्हणून अंबोली (Amboli Ghat) येथे आले होते. दरम्यान, लघुशंकेसाठी घाटात खाली उतरलेले मीतिलेस पॅकेरा दरीत कोसळले.

अधिक माहिती अशी की, मीतिलेस पॅकेरा हे गोव्यावरुन परतत होते. दरम्यान, ते तीन पोलिस आंबोली घाटातील एका धबधब्याजवळ उतरले. अनोळखी रस्ता आणि परिसर असल्याने त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे तुटलेल्या कठड्यातून ते पाय घसरुन दरीत खाली पडले. जी 300 फूट खोल होती. दरम्यान, वेळ रात्रीची असल्याने अंधार होता. परिणामी त्यांच्या सहकाऱ्यांनाही नेमके काय घडले याचा अंदाज आला नाही. त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क केला. या वेळी अंबोली पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलीस अवघ्या 30 मीनिटांतच दरीत उतरुन मीतिलेस पॅकेरा यांच्याजवळ पोहोचले. मदत आणि बचाव पथकाचे पोलीस पोहोचले तेव्हा मीतिलेस पॅकेरा जीवंत होते. मात्र, पुढच्या काहीच मिनिटांत त्यांनी प्राण सोडले. (हेही वाचा, Modi Modi Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळुरुमध्ये रोड शो, कार्यकर्त्यांकडून 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा (Watch Video))

दरम्यान, मीतिलेस पॅकेरा यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. हा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केद्रात ठेवण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यांतर हा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हा मृत्यू अपघाती आहे की घातपाती याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.