छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महापालिकेच्या माजी महापौरांच्या महागड्या बुटाची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी डोळ्यांना दिसत असूनही त्यांना अटक मात्र करता येत नाही अशी स्थिती आहे. घटना तशी साधीच पण, शहराचे प्रथम नागरिक राहिलेल्या माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा कथीतरित्या तब्बल 15, 000 रुपयांचे बूट चोरीला गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. यंत्रणाही कामाला लागली. महापौरांचा बुट चोरीला जातोच कसा. अखेर यंत्रणांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चोरांचा पत्ता लागला. हे चोर दुसरे तिसरे कोणी नसून शहरातील भटके कुत्रे असल्याचे पुढे आले. त्यामुळे सध्या तरी कुत्र्यांवर बुट चोरल्याचा आरोप आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही याबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे. घोडेले यांनी म्हटले आहे की, बुट ही केवळ एक वस्तू आहे. ती गेली. त्याच्या बातम्या झाल्या हा वेगळा विषय. पण या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचा विषय पुढे आला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: नागरिकांना जेरीस आणले आहे. महापालिकेने इतका निधी दिला आहे. इतक्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही शहारातील भटक्या कुत्र्यांची संख्या काही कमी होतना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. जेणेकरुन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होईल. मध्यंतरी भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. इतकेच नव्हे तर पुढे त्याचा मृत्यूही झाल्याची आठवण नंदकुमार घोडेले यांनी सांगितली.
काय घडलं नेमकं?
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे शहरातील इटखेडा परिसरात पाठिमागील अनेक वर्षांपासून राहतात. या परिसरात त्यांचे खासगी निवासस्थान आहे. दरम्यान, घटना घडली त्या दिवशी घोडेले यांच्या घराचे फाटक चुकून उघडे राहिले. त्याचा फायदा घेऊन काही भटके कुत्रे घराच्या अंगणात आले. काहीतरी खायला मिळेल या आशेने ते आत आले. मात्र, त्यांची निराशा झाली. मग झुंडीने आलेल्या या कुत्र्यांपैकी एकाने घोडेले यांचा बुट तोंडात धरला आणि धूम ठोकली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. या घटनेनंतर पालिकेने काही कुत्र्यांना पकडल्याचे समजते.