मुंबईतील महत्वाची शासकीय कार्यालये, संस्था आणि उद्योगही बाहेर नेले जात आहेत. लाखो तरुण बेरोजगार होत आहे पण राज्य सरकार काहीही बोलायला तयार नाही. सरकारविरोधात काही बोललं की ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचं एकदिवसीय शिबीराचे घाटकोपर मुंबई येथे पार पडले. या शिबिरात उपस्थित कार्यकर्त्यांना छगन भुजबळ यांनी “मुंबई महानगरपालिकेमधील सत्तेचे राजकारण, अर्थकारण, उदात्तीकरण-शासनाचा हस्तक्षेप” या विषयावर मार्गदर्शन केले.
खारघर या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेवरुन छगन भुजबल यांनी सरकारला खडे बोल सुनावले. उन्हातान्हात निष्पाप लोकांचा बळी गेला. भारतरत्नसारखा पुरस्कारही दिल्लीच्या भवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिला जातो. मग महाराष्ट्र भूषणच्या या कार्यक्रमातून कोणाची ताकद दाखवायची होती. या सरकारला आपल्या पाठीमागे किती लोक आहेत, हे दिल्लीवाल्यांना दाखवायचं होतं का? असा सवाल त्यांनी केला.
पक्षाच्या कार्यालयापेक्षा लोकांमध्ये मिसळणं जास्त गरजेचे आहे. निवडणुका कधीही लागतील. अडचणी खूप येतील. तुम्ही जर मजबूत असाल तर यश तुमच्या पाठीमागे येईल. कोण आपल्याबरोबर आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही. आपण आपल्या ताकदीवर उभं राहायला पाहिजे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण उभे राहू शकतो. असे देखील भूजबळ यांनी कार्यकर्त्यांना म्हटले.
महापालिका निवडणुकीत लोकांसोबत लहानसहान गोष्टींमधून जोडले गेले पाहिजे. लोकांचे स्थानिक प्रश्न, रुग्णालयात भरती करणे, शाळांमधील प्रवेश, पोलिस त्रास देत असतील तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. वॉटर, मीटर आणि गटार या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. राजकारणावर कितीही बोलले तरी जोपर्यंत तुम्ही लोकांशी जोडले जात नाही, तोपर्यंत निवडणुकीत अडचणी निर्माण होत राहतील, असे भुजबळ यांनी सांगितले.