Chhagan Bhujbal | (Photo Credits: Facebook )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे लवकरच शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकल्या आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या खळबळीची वेळीच दखल घेत छगन भुजबळ यांनी स्वत:च या वृत्ताबाबत खुलासा केला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे. शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा माझा कुठलाच विचार नाही. माझ्या संभाव्य शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांतून सुरु असलेल्या बातम्या या निराधार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संभाव्य शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांनी दस्तुरखुद्द छगन भुजबळ यांनाच विचारले. या वेळी भुजबळ म्हणाले की, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतची माहिती मला वृत्तपत्रातून मिळाली. माझे त्यांच्याशी (अहीर) बोलणे झाले नाही. पण, त्यांच्यासोबत माझेही नाव शिवसेना प्रवेशबाबत जोडले जात आहे. पण, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. शिवसेना पक्ष प्रवेशाबाबतच्या माझ्या नावाची होत असलेली चर्चा ही निराधार आहे. खरं म्हणजे प्रसारमाध्यमांनी हा संबंध लावलाच कसा हे मलाही कळलं नाही. कदाचित माझे मुंबईतील निवासस्थान आणि अहिर यांचे निवासस्थान जवळ जवळ असल्याने प्रसारमाध्यमानी कदाचित हा संबंध लावला असवा, असा मिष्कील टोलाही भुजबळ यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे वृत्त आज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर झळकत आहे. स्वत: सचिन अहिर यांनीही अत्याप या वृत्ताबाबत कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, अहिर यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी अहिर हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त दिले आहे. तसेच, सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याच्या पोस्टही सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. (हेही वाचा, मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष सचिन अहिर शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता; WhatsApp वरील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे अहिर यांचा शिवसेना प्रवेश होणार असल्याचे समजते. दरम्यान, सचिन अहिर यांच्या नावासोबत छगन भुजबळ यांचेही नाव घेतले जात होते. मात्र, भुजबळ यांनीच हे वृत्त फेटाळून लावल्यामुळे सध्यातरी या वृत्तात तथ्य नसल्याचे पुढे आले आहे.