Chandrapur: काँग्रेसचा अंतर्गत वाद ठाकरे सरकारच्या डोक्याला ताप, Congress खासदाराकडून CBI चौकशीची मागणी;अमित शाह यांच्याकडूनही अश्वासन
Congress | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय तपास यंत्रणा आगोदर महाराष्ट्र आणि महाविकासआघाडी सरकारवर विशेष लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे राज्य सरकार सावध असतानाच काँग्रेसच्या (Congress) अंतर्गत वादामुळे महाविकासआघाडी सरकारच्या डोक्याला ताप झाल्याचे चित्र आहे. निमित्त ठरले आहे चंद्रपुर जिल्हा मध्यवर्थी बँक (Chandrapur District Central Bank) गैरव्यवहार प्रकरण. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी लोकसभेत केली आहे. काँग्रेस आमदारानेच ही मागणी केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आता इतका 'फूल टॉस' बॉल आल्यावर केंद्र सरकार तो सीमेपार टोलवणार हे निश्चितच होते. त्यानुसार केंद्रीय सहकारमंत्री अमत शाह यांनीही धानोरकर यांच्या मागणीवर चौकशीचे अश्वासन लगोलग दिले आहे.

दरम्यान, काँग्रेस आमदार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीही विधानसभेत चंद्रपूर जिल्हा बँक गैरव्यवहाराचे प्रकरण उपस्थित केले होते. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे. चंद्रपुरमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्यात पक्षांतर्गत शितयुद्ध सुरु आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच अशा प्रकारची मागणी पुढे आली आहे, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चंद्रपुर जिल्हा बँकेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे पक्षाच्याच आमदार खासदाराने अशा प्रकारे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्याने काँग्रेसमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्थी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी केली. त्यामुळे या मागणीला अधिक महत्त्वाची मानली जात आहे.