यवतमाळ: चंद्रज्योती शेंडे भारतीय कम्युनिस्ट पक्षातून निलंबीत, वणी पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी भोवली
Communist Party of India | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Wani Panchayat Samiti Election 2020:  वणी पंचायत समिती (Wani Panchayat Samiti) उपसभापती चंद्रज्योती शेंडे (Chandrajyoti Shende) यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातून (CPI) निलंबीत करण्यात आले आहे. पक्षविरोधी कार्य केल्याने शेंडे यांच्यावर पक्षनेतृत्वाने ही कारवाई केली. भाकप यवतमाळ जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे यांनी ही माहिती दिली. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय वणी येथील स्थानिक भारतीय कम्युनिस्ट पक्ष बैठकीत घेण्यात आला होता. हा निर्णय पं.सं. सदस्य शेंडे यांनीही मान्य केला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली तेव्हा भाजपच्या सहकार्याने शेंडे यांनी उपसभापती पद मिळवले. पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेत सहभागी होत पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात आल्याचेही कॉ. अनिल घाटे यांनी म्हटले आहे.

वणि पंचायत समितीमध्ये भाजप 4, शिवसेना 3 आणि कम्युनिस्ट पक्ष 1 असे संख्याबळ आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती निवडणूक बहुमतासाठी 5 हा आकडा जादूई होता. त्यामुळे पंचायत समितीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला बहुमतासाठी 1 मत कमी पडत होते. दुसऱ्या बाजूला शिवसेनेने दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामुळे भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांच्या मताला मोठे महत्त्व होते.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 3 मतं मिळाली. तर, भाजपचे सभापती पदाचे उमेदवार संजय पिंपळशेंडे यांना 5 मतं मिळाली. भागपच्या चंद्रज्योती शेंडे या मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच शेंडे यांचे मत भाजपला गेले हे उघड होते. दुसऱ्या बाजूला शेंडे या स्वत: उपसभापती पदाच्या उमेदवार होत्या. त्यांनाही 5 मते मिळाली. त्यामुळे बहुमतासाठी त्यांच्याकडे नसलेली अतिरिक्त 4 मतं ही भाजपची मिळाली हे उघड होत होते. या तत्कालीन राजकारणामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर युती झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तशा बातम्याही प्रसारमाध्यमांतून झळकल्या होत्या. (हेही वाचा, यवतमाळ: धक्कादायक! भाजप आणि CPI यांच्यात युती? वणी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत आश्चर्यकारक चित्र)

दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षातून चंद्रज्योती शेंडे यांचे निलंबन केल्यामुळे भाजप आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यात युती झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, तशा प्रकारच्या वृत्तांचेही खंडण झाले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय पिंपळशेंडे यांनी शिवसेनेच्या तुकाराम खाडे यांचा पराभव केला. तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत चंद्रज्योती शेंडे यांनी शिवसेनेच्या वर्षाताई पोतराजे यांचा पराभव केला. संजय पिंपळशेंडे आणि चंद्रज्योती शेंडे यांना प्रत्येकी 5 मते मिळाली. तर, विरोधात असलेल्या तुकाराम खाडे आणि वर्षाताई पोतराजे यांना प्रत्येकी 3 मते मिळाली.