Maharashtra Monsoon Update: पुणे, मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्यामध्ये पावसाची शक्यता- IMD
Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

Maharashtra Monsoon Update: राज्यात एकीकडे कोरोनाचा थैमान तर दुसरीकडे अवकाळी पावसाची चिंता यामुळे या राज्यातील जनता पुरती होरपळून गेली आहे. दरम्यान मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी आज आणि उद्यामध्ये राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचे ढग घोंघावत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान काल पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. नाशिकजवळील लासगाव परिसरात काल पडलेल्या पावसामुळं कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असून तुरळक गारपीट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Rains Update: सिंधुदुर्ग, धुळे, नांदेडसह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांत वादळी वा-यासह पावसाची शक्यता- IMD

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड हाल केले आहेत. एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. कागल, चंदगड आणि भुदरगड तालुक्‍यातील गारपीट देखील झाली. राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत असून नाशिकमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, यापूर्वी मार्च महिन्यात देखील अवकाळी पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली होती.