केंद्राचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडवण्याची दिल्लीतील लोकांची इच्छा- Minister Jayant Patil
Jayant Patil | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना विषाणू (Coronavirus) लसीचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. केंद्राने लसीचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र केंद्राने ही गोष्ट फेटाळून लावत राज्याला पुरेसे लसीचे डोस दिले असल्याचे सांगितले. यानंतर आता जणू काही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे. यावर, केंद्राचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडवण्याची दिल्लीतील लोकांची इच्छा असल्याचे मत मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले आहे.

जयंत पाटील म्हणतात, ‘स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत. काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी मनात शंका आहे. देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते.’ (हेही वाचा: दर आठवड्याला किमान 40 लाख Covid19 Vaccine चा पुरवठा करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी)

शेवटी ते म्हणतात, ‘महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या आहेत मात्र, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.50 कोटी तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 4.73 लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात 80 लाख लसी, तिथे लोकसंख्या 6.50 कोटी आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 17 हजार आहे.’