मुंबई: दादरजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याण दिशेने जाणारी मध्य रेल्वे सेवा विस्कळीत
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

रोज रेंगाळलेली आणि रखडत जाणारी मध्य रेल्वेने आज तर समस्यांचा जणू उच्चांकच गाठला. आजचा दिवस हा मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. सकाळी रुळाला तडे गेल्याने, त्यानंतर दुपारी नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने अप मार्गावरील विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची सेवा आता दादरजवळील (Dadar) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने डाऊन मार्गावरची जलद रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या खोळंबल्याने चाकरमान्यांना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दादर जवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर जलद मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सिग्नलमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून जलद मार्गावरील गाड्या तूर्तास धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. तसेच अनेक तांत्रिक अडचणीमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्याही रखडल्या आहेत. हेही वाचा- मुंबई: नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

दुपारी नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धा तास उशिराने धावत होत्या. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे ही सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या कारणाने ही मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत होत्या. तर सकाळी मुलूंड-ठाणे दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. हेदेखील वाचा-

मुंबई: ठाणे - मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

समस्यांचे माहेरघर बनत चाललेल्या मध्य रेल्वेपासून कधी सुटका होणार आणि मध्य रेल्वे प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.