सई ताम्हणकर (Image Credit: Stock Photos)

खेळ आणि सेलेब्रिटी यांमध्ये नक्कीच काहीतरी आगळेवेगळे नाते आहे. सेलिब्रिटींनी आयपीएलच्या टीम्स विकत घेतल्यानंतर आयपीएलला ग्लॅमर प्राप्त झाले. याच धर्तीवर मराठीमध्ये पहिल्यांदा असा प्रकार दिसून आला, तो म्हणजे मराठी मातीतल्या कुस्तीसाठी. आता पहिल्यांदाच एका मराठी सुपरस्टारच्या मालकीचाही खेळाडूंचा संघ असणार आहे.

नोव्हेंबर 2 ते 18 दरम्यान 'झी महाराष्ट्र कुस्ती दंगल लीग'ची घोषणा झाली आहे. या लीगसाठी सहा संघांची घोषणा करण्यात आली असून, त्यांचे मालक म्हणून चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आदिंनी जबाबदारी स्वीकारली आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर होणारी ही कुस्ती लीग कुस्ती शौकिनांसाठी एक पर्वणी ठरणार आहे यात शंका नाही. इंडियन प्रीमियर लीग आणि प्रो कबड्डी प्रमाणेच या लीगचे देखील सेलिब्रिटींच्या सहभागामुळे महत्व वाढले आहे.

कुस्ती हे महाराष्ट्राचे वैभव मानले जाते, त्यामुळे या खेळला एक वेगळे महत्व प्राप्त व्हावे, अपेक्षित पैसा-प्रसिद्धी यादृष्टीने या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता असलेल्या या लीगचे स्वप्नील जोशी (विदर्भाचे वाघ), सई ताम्हणकर(कोल्हापुरी मावळे), नागराज मंजुळे(वीर मराठवाडा), पुरुषोत्तम जाधव(यशवंत सातारा), राकेश ढाके(मुंबई अस्त्र) आणि शांताराम मानवे (पुणेरी उस्ताद) हे कुस्तीच्या या महासंग्रामातील सहा संघांचे मालक असतील.

‘या लीगसाठी एकूण 90 खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंमधून सहा संघांची विभागणी करण्यात आली आहे. विजेत्यांना 50 लाख तर उपविजेत्यांना 30 लाखांचे इनाम देण्यात येईल. तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 20 लाखांचे पारितोषिक असेल. प्रत्येक संघाला या खेळाडूंच्या लिलावाप्रसंगी कमाल ४० लाख खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती,' अशी माहिती झी टॉकीज आणि झी युवाचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी दिली.

मूळ सांगलीची असलेली सई ताम्हणकर या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीमओनर्समध्ये एकुलती एक महिला टीमओनर असणार आहे. सतत काही नवीन करण्याचा ध्यास तिच्या चित्रपटांमधून दिसून येतो, यामुळेच खेळाच्या क्षेत्रातही काही नवीन करण्याच्या इराद्याने सईने आता कुस्ती क्षेत्रातही उडी घेतली आहे.