Aaditya Thackeray | Photo Credits: Facebook

संस्कृती आणि कलेच्या बाबतीत जसा महाराष्ट्र प्रसिद्ध आहे, तसाच तो पर्यटनाच्या (Tourism) बाबतीतही आहे. सुंदर समुद्रकिनारे, हिल स्टेशन्स यांसह महाराष्ट्राला 350 हून अधिक गड किल्ल्यांचे (Forts) वैभव लाभले आहे. या किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे सोशल मिडीयावर व्हिडिओग्राफी व छायाचित्रणाची एक स्पर्धा आयोजित केली आहे. दिनांक 8 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत गड–किल्ल्यांवर आधारित ही स्पर्धा पार पडेल. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ही माहिती दिली.

महाविकास आघाडीच्या खातेवाटपात ठाकरे कुटुंबाचे पहिले वाहिले आमदार आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज त्यांनी पदाचा कार्यभार सांभाळत पहिला निर्णय घेत या स्पर्धेची घोषणा केली. राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश–विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड–किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे, तसेच पर्यटक व अभ्यागत यांना या गड–दुर्ग किल्ल्यांबाबतची ऐतिहासिक माहिती करुन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

अशी असेल ही स्पर्धा -

ही स्पर्धा व्हिडिओग्राफी व छायाचित्रण प्रकारांत, खुली श्रेणी व व्यावसायिक श्रेणी या दोन विभागात असेल. छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी खुल्या गटातील स्पर्धा आहे.

खुली श्रेणी -

पारितोषिक - पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये आणि 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये (हेही वाचा- मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र पर्यटन मजबूत करून अर्थव्यवस्था सुधारवण्याचा निर्धार)

व्यावसायिक श्रेणी -

छायाचित्रण - पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि दहा विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये पारितोषिक राहील.

व्हिडिओग्राफी - प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पंच्याहत्तर हजार रुपये व तृतीय पारितोषिक पन्नास हजार रुपये असेल. दहा विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पारितोषिक राहील.

#MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह हे फोटो पोस्ट करावेत. यासाठी  पर्यटन विभागाचे  @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करणे गरजेच आहे.