महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान, केलेल्या विधानावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. 'राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद (Casteism In Maharashtra) अधिक वाढला' हे ते राज ठाकरे यांचे विधान. राज ठाकरे यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जातियवादा (Casteism) हा मुद्दा चर्चेला येणार यात नवल नव्हते. तसेच, राज ठाकरे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येणे हेही स्वाभाविक होते. तशी ती आलीही. पाहा राज ठाकरे यांच्या विधानानंतर काय प्रतिक्रिया आल्या?
राज ठाकरे यांचे वक्तव्य अज्ञानातून - नवाब मलिक
राज ठाकरे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पहिली प्रतिक्रिाया आली नवाब मलिक यांची. नवाब मलिक यांनी म्हटले की, राज ठाकरे यांना जातियतेचा इतिहास बहुदा माहिती नसावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालतो. या महामानवांनी जातियता नष्ट करण्यासाठी महत्त्वाचे काम केले. या देशात मुनवादी व्यवस्थेमुळेच जाती निर्माण झाल्या. त्यामुळे जाती आधारे निर्माण झालेल्या व्यवस्थेत अनेकांवर अन्याय होत असल्याचे राज ठाकरे यांना माहिती नसावे. त्यामुळे त्यांनी अज्ञानातूनच हे वक्तव्य केले असावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (हेही वाचा, Sharad Pawar On Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या जातीवादाच्या आरोपाला शरद पवार यांचे उत्तर, दिला 'हा' सल्ला)
राज ठाकरे यांनी आजोबांची पुस्तके वाचावित- शरद पवार
राज ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर 'राज ठाकरे यांच्याबाबत न बोललेलेच बरे. त्यांनी आपल्या आजोबांची पुस्तके वाचावीत' असा सल्लाही शरद पवार यांनी ठाकरे यांना दिला.
संभाजी ब्रिगेड आक्रमक
राज ठाकरे यांनी आजोबांची पुस्तके वाचावीत असा जाहीर सल्ला शरद पवार यांनी दिला. त्यानंतर संभाजी ब्रिगेड जोरदार आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेड राज ठाकरे यांना आजोबा म्हणजेच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची पुस्तके राज ठाकरे यांना कुरीअर करणार आहे. याशिवाय संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलिकडचा इतिहास माहिती नाही. त्यांना त्यापलीकडील इतिहासाचे आकलन नाही. महाराष्ट्राच्या नावाने कोणतेही नवनिर्माण न करता आलेला राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस केवळ स्वत:च्या राजकारणासाठी राज्यात नवा संघर्ष निर्माण करु पाहतो आहे, असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे.