प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

नुकतीच महाराष्ट्राची लाईफलाईन, लाल परी, एसटी (ST) 71 वर्षांची झाली. या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने एसटीचा प्रवास कॅशलेस (Cashless) व्हावा म्हणून, रिचार्ज कार्डची घोषणा केली. म्हणजे आता या कार्डचा रिचार्ज करून तुम्ही पैशांशिवाय एसटीने प्रवास करू शकणार आहात. याबाबतील अजून एक खुशखबर आहे, आता एसटीच्या या स्मार्ट कार्डच्या पहिल्या रिचार्जवर प्रवाशांना 5 % कॅशबॅक मिळणार आहे. सध्या फक्त एसटी बसच्या आगारातच ही कार्ड मिळण्याची सोय आहे, मात्र लवकरच प्रवासी त्यांच्या मोबाईलवरूनही रिचार्ज करू शकणार आहेत.

एसटी महामंडळाचे दिवाकर रावते यांनी या कार्डची घोषणा केली होती. सध्या या कार्डची किंमत 50 रुपये असून, 300 रुपयांचा रिचार्ज केल्यावर कार्डमध्ये 315 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर 100 च्या पटीत रिचार्ज करावा लागेल. मात्र यासाठी या कार्डची नोंदणी करावी लागणार आहे, त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर हे कार्ड मिळू शकेल. या कार्ड मध्ये जितकी रक्कम आहे तेवढा प्रवास प्रवासी करू शकणार आहेत. (हेही वाचा: एसटीचा प्रवास झाला कॅशलेस, कर्मचारी व प्रवाश्यांसाठी एसटी महामंडळांने लागू केल्या 'या' नव्या योजना)

या कार्डवर प्रवाशाची सर्व माहिती असल्याने भविष्यात याचा उपयोग शॉपिंगसह इतर प्रवासी वाहतुकीसाठी ई-तिकिटींगसाठीही करता येणार आहे. हे कार्ड घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता आहे. आधारकार्डसोबतच मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्ट या तिनपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.