नवी मुंबई: पॅराशूटद्वारे उतरलेल्या अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल
Representational Image (Photo Credit: Pixabay)

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई (Navi Mumbai) येथील घणसोली (Ghansoli) परिसरात एक अज्ञात महिला पॅराशूटद्वारे (Parashoot) उतरल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाची माहिती स्थानिकांनी पोलिसांनाही दिली होती. पोलिस या अज्ञात महिलेचा शोध घेत असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने समर्थ हाईट्स या इमारतीमध्ये परवानगी न घेता प्रवेश केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (नवी मुंबई: पॅराशूटद्वारे अवतरली परदेशी महिला; स्थानिकांमध्ये खळबळ)

2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास घणसोली सेक्टर 15 मधील पामबीच रोडवरील बांधकाम सुरु असलेल्या समर्थ हाईट्स या इमारतीत ही महिला पॅराशूटद्वारे उतरली. हा सर्व प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसात धाव घेतली. मात्र ती महिला कारमधून आलेल्या एका व्यक्तीसोबत निघून गेली. याप्रकरणी पोलिसांनी सीसी टीव्ही फूटेजही तपासले आहे.

या महिलेने इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून बेस जपिंग केले. ज्या ठिकाणी ही महिला उतरली तेथे तिच्या पायांच्या ठशांची पडताळणीही पोलिस करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ती महिला आणि तिच्यासोबतचा पुरुष हे दोघे नेमके कोण होते, याचा पत्ता अद्याप लागलेला नाही. या दोघांचाही शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.