माजी महापौर Kishori Pednekar यांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल; BEST कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याचा आरोप
Kishori Pednekar (संग्रहित संपादित प्रतिमा)

लोअर परळ येथील एनएम जोशी पोलिसांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या मालकीच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (Kish Corporate Services Pvt. Ltd) तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जवळजवळ 264 बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) रोखल्याप्रकरणी शनिवारी हा गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणी वांद्रे येथील रहिवासी 45 वर्षीय विद्या संदीप बाबर नावाच्या तक्रारदाराने प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला होता.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस आणि गिरीश रमेश रेवणकर अशा तीन कर्मचाऱ्यांवर पीएफ खात्यात न जमा केल्याचा आरोप आहे. अनेक कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला गेला पण त्यांच्या पीएफ खात्यात कधीही तो जोडला गेला नाही

बाबर यांनी आरोप केला की, कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकूण 4,47,84 रक्कम कापली गेली मात्र ती पफएफ खात्यात जमा केली नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये 127 कर्मचार्‍यांचा पीएफ त्यांच्या खात्यात भरला नाही, तर नोव्हेंबर 2021 मध्ये 137 कर्मचार्‍यांना पैसे दिले गेले नाहीत. आता या विरुद्ध नोंदवलेल्या प्रकरणात, भारतीय दंड संहितेच्या 406 (गुन्हेगारीचा भंग), 34 यासह इतर कलमे जोडण्यात आली आहेत.

याबाबत फ्री प्रेस जर्नलने एनएम जोशी मार्ग पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, याआधी वरळीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर झाला होता. (हेही वाचा: मुंबई मध्ये UPI Transactions मध्ये आर्थिक फसवणूक करणार्‍यांसाठी खोटी बॅंक अकाऊंट्स बनवून देणार्‍याला अटक; प्रत्येक अकाऊंट मागे मिळवत होता 60 हजार रूपये)

या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला असून, या प्रकरणात याचिकादाराविरोधात तूर्त आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. पेडणेकर यांच्या याचिकेवर 30 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.