महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. बुलढाणा (Buldana) मधील 8 वर्षांच्या चिमुकलीने कोविड 19 (Covid 19) वर यशस्वीरीत्या मात केली आहे. कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या मुलीचा व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओत ती चिमुकली तोंडाला मास्क लावून हातात फुलं घेऊन घरी जाण्यासाठी निघाली आहे. अॅम्बुलन्सपर्यंत चालत जात तिने सर्वांचा दूरुनच निरोप घेतला.
त्याचबरोबर महाराष्ट्रात 94 वर्षांच्या आजीबाई ते 22 दिवसांच्या बाळापर्यंत सर्वांनीच कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे. आणि हे महाराष्ट्रातील सक्षम आरोग्य यंत्रणेचे यश आहे, असे गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असला तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. (लॉकडाऊन काळात सायबर क्राईम मध्ये वाढ; बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या गुन्हांना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार- गृहमंत्री अनिल देशमुख)
Anil Deshmukh Tweet:
बुलडाण्यातील 8 वर्षीय चिमुकलीला योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे #Covid19 वर तिने यशस्वीरित्या मात केली आहे. महाराष्ट्रात 94 वर्षांच्या आजीबाईंपासून ते 22 दिवसाच्या चिमुरडीपर्यंत अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. हे महाराष्ट्रातील सक्षम आरोग्य यंत्रणेच यश आहे.#WarAgainstVirus pic.twitter.com/39XYf7yvn2
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 24, 2020
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47190 वर पोहचला आहे. यापैकी 13404 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 32209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 1577 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आहे. दरम्यान लॉकडाऊन काळात सायबर क्राईममध्ये वाढ झाली असून आक्षेपार्ह मेसेज पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.