लॉकडाऊन काळात सायबर क्राईम मध्ये वाढ; बलात्कार, अॅसिड हल्ला यांसारख्या गुन्हांना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार- गृहमंत्री अनिल देशमुख
Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

लॉकडाऊन (Lockdown) सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) सायबर क्राईम्समध्ये (Cyber Crimes) वाढ झाली आहे. टिकटॉकच्या (TikTok) माध्यमातून बलात्कार, अॅसिड हल्ले यांना प्रोत्साहन देणारे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्य सायबर क्राईम विभाग सतर्क असून अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्ट, कन्टेंट खपवून घेतल्या जाणार नाही. याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh)  यांनी सांगितले आहे. (Lockdown: लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात 1,07,256 गुन्हे दाखल, 4,10,79,494 रुपये दंड वसूल- गृहमंत्री अनिल देशमुख)

तसंच व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक यांसारख्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून अफवा पसरवणे, भावना भडकवणे, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि स्त्रियांविरुद्ध चुकीच्या पोस्ट करणे या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. काही दिवसांपूर्वी बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याचे टिकटॉक व्हिडिओज समोर आले होते. त्याचाही गृहमंत्र्यांनी समाचार घेतला. हे सर्व चुकीचे असून महाराष्ट्र क्राईम ब्रांच सतर्क आहे. आम्ही अशा गुन्हेगारांना सोडणार नाही. अशा प्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ANI Tweet:

पहा व्हिडिओ:

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 24 मार्चपासून सुरु झाला. त्यानंतर हा कालावधी तीन टप्प्यात वाढवण्यात आला. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून तब्बल दोन महिने संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्य लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. लॉकडाऊनच्या तीन टप्प्यात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सारं काही ठप्प होतं. दरम्यान चौथ्या टप्प्यात काही उद्योगधंद्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन काळात सायबर गुन्हांचे प्रमाण वाढल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.