पालघरप्रमाणे उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहरातही साधूंच्या हत्याकांडाचा (Bulandshahr Sadhu Killing) प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) फोनद्वारे संपर्क साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधूंच्या हत्येवरुन चिंता व्यक्त करताना आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. सोबतच आमच्याप्रमाणे तुम्हीही कडक कायदेशीर कारवाई तसेच दोषींना कडक शिक्षा कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बुलंदशहरात घडलेल्या घटनेला धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु, कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा- पालघर नगर परिषद क्षेत्रात उद्यापासून 4 दिवस संपूर्ण लॉकडाउन, फक्त मेडिकल सुरु राहणार

ट्वीट- 

बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावात दोन साधूंची हत्या झाल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला नशा करण्याचे व्यसन आहे. आरोपीने साधूंचा चिमटा चोरला होता. त्यामुळे साधू आरोपीवर रागावले. त्यातूनच आरोपीने दोन्ही साधूंची सोमवारी तलवारीने रात्री हत्या केली. आरोपीला घटनास्थळावरून तलावार घेऊन जाताना ग्रामस्थानी बघितले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी दिली आहे.