विजेच्या धक्क्याने बहिण-भावाचा दुर्दैवी अंत, कर्जत शहरातील धक्कादायक घटना
Representational Image (Photo credits: PTI)

कर्जत (Karjat) शहरामध्ये गवंडी गल्लीत राहणा-या आर्यन विनय कुमार निषाद (७ वर्ष) आणि जान्हवी विनय कुमार निषाद (3 वर्ष) या भावा-बहिणीचा विजेच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला. आपल्या घराच्या गच्चीवर खेळत असताना अचानक वीज प्रवाह देणा-या वायरच्या ते संपर्कात आले. त्याचा तीव्र झटका लागून ह्या चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले विनय कुमार निषाद हे घराला रंगकाम करण्याचे काम करतात. उदरनिर्वाहासाठी ते आपल्या कुटूंबासोबत कर्जत शहरात आले होते. त्यांच्या एकट्यावरच संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी होती.

उत्तर प्रदेश: बुलंदशहर येथे मोबाईल चार्जरचा शॉक लागून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू

नेहमीप्रमाणे विनय कुमार काम गेले होते. आणि त्यांची पत्नी घरात स्वयंपाक बनवत होती. त्यामुळे त्यांची मुले आर्यन आणि जान्हवी गच्चीवर खेळण्यात दंग होती. अचानक गच्चीवर असलेल्या विद्युतप्रवाह देणा-या वायरच्या संपर्कात ते दोघे आले. काही कळायच्या आत त्यातील विजेच्या प्रवाहाचा तीव्र झटका लागल्याने त्या दोन्ही भाऊ-बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडताचा त्यांच्या शेजा-यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र त्याआधीच त्या दोघांचा दुर्दैवी अंत झाला होता.

ही घटना नेमकी कशी घडली ह्यासंबंधी कर्जत पोलीस अधिक तपास करत आहे.