Break The Chain Guidelines Updates: महाराष्ट्रात लॉकडाऊनला 1 जून पर्यंत मुदतवाढ; राज्यात प्रवेशासाठी RTPCR Test सक्तीची
Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत आता घट होत असली तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अजूनही ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत कडक करण्यात आलेली नियमावली 1 जून पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय आता झाला आहे. काल महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटने त्याबाबत एकमताने निर्णय घेतल्यानंतर आता आज (13 मे) त्याबाबातची नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आज लॉकडाऊन 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेताना आता पर राज्यातून येणार्‍या प्रत्येकाला कोविड 19 आरटी पीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह (RT PCR Negative Report) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक केले आहे.हे नवे निर्बंध 15 मे दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून लागू होतील.

महाराष्ट्र सरकारने आज नवी नियमावली जारी करत 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केले असलं तरी जुनेच नियम कायम ठेवले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी सारी दुकानं पूर्वीच्या नियमांनुसार सकाळी 7-11 या वेळेतच खुली राहतील. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांमध्ये घट होत असल्याचं दिलासादायक चित्र असलं तरीही देशातील इतर राज्यांमधील स्थिती पाहता आता रेल्वे, रस्ते, हवाई मार्गे महाराष्ट्रात येणार्‍या प्रत्येकाला किमान 48 तास आधी कोविड 19 च्या निदानासाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करत त्याचा निगेटीव्ह रिपोर्ट सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

एअरपोर्ट, बंदरावर काम करणार्‍यांना आता लोकल, मेट्रो, मोनो द्वारा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला काही अधिकार देत आता जिल्हाधिकारी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून 48 तासांची मुभा देत कडक लॉकडाऊन लावता येईल.

महाराष्ट्र सरकारची नियमावली

दरम्यान महाराष्ट्रात सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आता केवळ 45 वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण सुरू आहे. 18-44 या वयोगटासाठी लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. देशातील कोविड 19 लसींचा तुटवटा पाहता आणि दुसर्‍या डोससाठी प्रतिक्षेत असलेले नागरिक पाहता राज्य सरकारने सध्या त्यांनी खरेदी लसींचे डोस 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वळते करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. Mumbai: मुंबईमध्ये येणार Covid-19 लसीकरणाला वेग; BMC खरेदी करत आहे तब्बल 1 कोटी लसीचे डोस, IS Chahal यांची माहिती.

राज्यात काल आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार, 46,781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर 58,805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 46,00,196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5,46,129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे.