गोव्यात खवळलेल्या समुद्रात बुडाली होडी; एक खलाशी बेपत्ता, तटरक्षक दलाकडून शोधकार्य सुरू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

गोव्यात गुरुवारी खवळलेल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली एक होडी बेतूल येथे साळ नदीच्या (Sal River) मुखावर वाळूच्या पट्ट्यांना आपटून फुटली. त्यामुळे होडीचा तांडेल (होडी चालक) बेपत्ता झाला आहे. यातील 4 खलाशांना स्थानिक मच्छीमारांनी काठावर आणले आहे. सध्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर बेपत्ता झालेल्या तांडेलाचा शोध घेत आहे. गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली.  (Pune Rains: पुणे शहरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ; रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे ओढे,नदी पात्राच्या पाण्यात वाढ)

नेमकी काय घडलं?

बेतूल येथे सकाळी 9 च्या सुमारास गुरुवारी मासेमारी करून येणाऱ्या होड्या तडीकडे परतत असताना ही घटना घडली. यावेळी समुद्रात मासेमारी करण्यासाठी 26 होड्या गेल्या होत्या. यापैकी 25 होड्या परतल्या. परंतु, एक होडी साळ नदीच्या मुखावरील वाळूच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे होडी कलल्याने त्यातील 5 खलाशी पाण्यात पडले.

(मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याकडून Yellow Alert जाहीर)

हा सर्व प्रकार स्थानिक मच्छीमार जिजस डिकॉस्ता यांनी पाहिला. त्यांनी लगेचच आपल्या इतर  साथीदारांच्या मदतीने बुडणाऱ्या खलाशांना वाचवले. परंतु, पाण्याच्या लाटांमुळे होडीचा तांडेल वाहून गेला. तसेच लाटांच्या तडाख्यामुळे होडी फुटली. स्थानिकांनी या घटनेची माहिती तटरक्षक दलाला दिली. त्यानंतर लगेच तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर याठिकाणी दाखल झाले. तटरक्षक दलाने आज दुपारपर्यंत या तांडेलाचा शोध घेतला. परंतु, अद्याप त्याचा तपास लागला नाही. हवामान खात्याने वारंवार सूचना देवूनदेखील मच्छीमार खवळलेल्या समुट्रात गेले होते. त्यामुळे ही घटना घडली.

तसेच 25 ऑक्टोबर ला कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भातही मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.