COVID-19 in Mumbai (Photo Credits: PTI)

मागील काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली असून काही नियमही लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे. काल मुंबईत 823 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नव्या नियमानुसार बीएमसीने (BMC) शहरातील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. दरम्यान, 5 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या इमारती सील करण्याचा नवा नियम पालिकेने लागू केला आहे.

ANI च्या ट्विटनुसार, मुंबई शहरात 2749 कोरोना रुग्ण आढळल्याने बीएमसीने तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. त्यात एकूण 71,838 घरं आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. (BMC on Coronavirus: क्वारंटाईन असताना फिरल्यास FIR, लोकलच्या तिन्ही मार्गांवर 300 मार्शल तैनात; COVID 19 नियंत्रणासाठी मुंबई महापालिका सतर्क)

ANI Tweet:

दरम्यान, मुंबईत काल 823 रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 440 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याने पालिका प्रशासनासह महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच नियमाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून वारंवार केले जात आहे. लॉकडाऊनची वेळ आणून देऊ नका, अशी तंबीही प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईसाठी देखील पालिकेने मेगाप्लॅन तयार केला आहे. पुण्यातील निर्बंधांबाबत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.