Mumbai: कोरोनाचा उद्रेक! होम क्वारंटाइनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला महत्वाचा निर्णय
Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Coronavirus) अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना राज्यात पु्न्हा एकदा रुग्ण वाढू लागले आहेत. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), अमरावती (Amravati), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola) या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. दरम्यान, मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत. याचपार्श्वभूमीवर घरी विलगीकरण राहणाऱ्या रुग्णांच्या हातावर शिक्‍के मारावेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्‍हे दाखल करावेत, असे मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal) म्हणाले होते. मात्र,आता लक्षण विरहित लोकांनासुद्धा होम क्वारंटाइन करणार नाही. प्रत्येकाला कोव्हिड सेंटरमध्येच जावे लागणार आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या पाहता इक्बाल सिंह यांनी गुरुवारी नवे नियम जाहीर केले होते. इब्बालसिंग चहल यांनी दिलेल्या नियमांच्या यादीत वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर, त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत, असे म्हटले होते. यातच किशोरी पेडणेकर यांनी होम क्वारंटाइनबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यापुढे मुंबईत होम क्वारंटाइन बंद करण्यात आले आहे. प्रत्येकाला कोव्हिड सेंटरमध्येच जावे लागणार आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम आजपासून बंद करण्यात आल्याचे किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले आहे. हे देखील वाचा- मुंबई मध्ये NCP नेते Vijay Koli यांना Drugs Case मध्ये गोवण्याचा कट पोलिसांकडून उघड; 5 जणांना अटक

तसेच लग्न समारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणस दिसली तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे किंवा मास्क वापरण्याचे नियम मोडताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, हे याअगोदरच मुंबईच्या आयुक्तांनी जाहीर केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन 'एसएमएस' चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.