मुंबईतील बीएमसी शाळांबाबत (Mumbai BMC School) मोठी माहिती समोर येत आहे. शहरातील बीएमसी शाळेत 11 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांची 810 पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बीएमसी शाळांमधील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सर्वाधिक 250 पदे रिक्त आहेत. यानंतर मुंबईतील सार्वजनिक शाळांमधील 222 रिक्त पदांची माहिती समोर आली आहे.
बीएमसीचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले की, नागरी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी नियुक्ती होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे यापूर्वी जुलैमध्ये बीएमसीने नागरी शाळांना 150 रुपये प्रति तास या दराने कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा केवळ तात्पुरता उपाय होता.
याशिवाय, नागरी शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षक असलेल्या शैक्षणिक स्वयंसेवी संस्था किंवा सरकारी आणि खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांची निवड केली आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार कंकाळ म्हणाले, ‘माध्यमिक शाळांमधून 550 अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी आम्हाला नुकतीच शालेय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांची मंजुरी मिळाली आहे. यामुळे जर का नागरी शाळांमधील रिक्त पदे भरल्यास आम्हाला कंत्राटी शिक्षकांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि समस्या सुटेल.’ (हेही वाचा: Job Recruitment: Mazagon Dock मध्ये नोकरीची संधी, मिळवा 80 हजारांहून अधिक पगार)
दरम्यान, बीएमसी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना दिल्या जाणाऱ्या कपडय़ांना महापालिकेने हिरवा कंदील दिल्याचे वृत्त गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आले होते. यंदा ड्रेससाठी 88 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे बीएमसीने सांगितले. मात्र, महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने शाळा सुरू होऊन तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांना यंदा ड्रेस मिळणार आहेत.