छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही'; महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा अजब दावा
Bmc Mayor Vishwanath Mahadeshwar | (Photo Credits: Facebook)

मुंबई (Mumbai) शहराला मुसळधार पावसाने कालपासूनच झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. आजही (1 जुलै 2019) मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत आणि रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी तर, शहरात पाणीच पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर जेरीस आला असला तरी, मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Bmc Mayor Vishwanath Mahadeshwar) यांना मांत्र मुंबईचा पाऊस दिसलाच नाही. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी चक्क 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही', असा दावा केला आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबापुरीची तुंबापुरी आणि मुंबईकर हैराण झाला असला तरी, महापौरांनी केलेल्या दाव्यामुळे मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापौर महाडेश्वर यांचा निराधार दावा

मुंबई शहरात पाणी साचल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारले असता, तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करत आहात. मुंबई कुठेच तुंबली नाही. इतकंच नव्हे तर, कुठेही पाणी तुंबलेलं नाही किवा वाहतूक कोंडी झालेली नाही. मुंबईचे जनजीवन अजिबात विस्कळीत झालेलं नाही’, असा निराधार दावा केला. (हेही वाचा, LIVE Maharashtra Monsoon 2019 Live Updates: 5 जुलैपर्यंत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा)

कचरा किंवा प्लास्टिक अडकल्याने पाणी मुंबईत पाणी साठतं - महापौर

दरम्यान, अधिक माहिती देताना महाडेश्वर म्हणाले की, ज्या काही भागात पाणी साचले होते त्या भागात पंपाद्वारे पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. महापौर म्हणून मी सर्व ठिकाणी फिरलो. कुठेही मला पाणी तुंबलेलं दिसलं नाही. मुंबईचे जनजीवन सुरळीत सुरु असल्याचा दावा करताना मात्र कचरा किंवा प्लास्टिक अडकल्याने पाणी मुंबईत पाणी साठत असल्याचंही ते या वेळी म्हणाले.