Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रात नवे सरकार येऊन महिना उलटला तरी भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद वेळोवेळी जनतेसमोर येत आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा असे सांगितले. तसेच शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताची शिक्षा झालीच पाहिजे. भाजप पक्ष मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटासह बीएमसी निवडणूक लढवून 150 जागा जिंकेल. याच्या एक दिवसानंतर, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी अमित शाह यांचे हे आव्हान स्वीकारले असून ते भाजपचे ध्येय पूर्ण होऊ देणार नाहीत तर, निवडणुकीनंतर बीएमसीमध्ये आपली सत्ता कायम ठेवेल.

महापालिका निवडणुकांची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्रीवर बैठक घेतली, यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. बीएमसीमध्ये 150 जागा जिंकण्याच्या शाह यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर, उद्धव यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना अधिक मजबूत करून, लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.

यावेळी पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आता जे आहेत ते मूठभर असलेत तरी चालतील पण ते निष्ठावंत हवेत. गद्दारांपेक्षा मूठभर निष्ठावंत नेहमीच बरे.’ (हेही वाचा: BJP बारामतीत NCP ला कडवी लढत देईल, Chandrashekhar Bawankule यांचे वक्तव्य)

ते म्हणाले, ‘शिवसेनेसह मुख्यमंत्रीपदही माझी वैयक्तिक मालमत्ता नाही. बंडखोर आमदारांना मुख्यमंत्रिपद हवे असते तर मी ताबडतोब पायउतार झालो असतो. मीही 30-40 आमदारांना डांबून ठेऊ शकलो असतो. मी त्यांना कोलकाता किंवा राजस्थानला नेले असते. परंतु हा माझा स्वभाव नव्हता. त्यामुळे, राहायचे असेल तर निष्ठेने रहायचे, मनामध्ये शंका घेऊन राहण्यात काही अर्थ नाही. सर्वांसाठी दरवाजा उघडा आहे ज्यांना रहायचे आहे त्यांनी निष्ठेने रहा ज्यांना जायचे आहेत त्यांनी जा असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी शिवतिर्थावर दसरा मेळावा आपलाच होणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.