BEST bus (Photo Credits: PTI)

BEST Employee Diwali Bonus 2020:  मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर झाल्यानंतर शहरात बेस्ट कर्मचारी आणि अधिकार्‍यांनीही बोनस मिळावा अशी आशा व्यक्त केली होती. त्यानुसार, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी बेस्ट कर्मचारी (BEST Employee)  व अधिकार्‍यांना गोड बातमी दिली आहे. मुंबई मध्ये बेस्ट कर्मचार्‍यांना यंदा 10,100 रूपये दिवाळी बोनस (Diwali Bonus) म्हणून दिला जाईल असं सांगण्यात आले आहे. तर बोनस सोबतच बेस्ट कर्मचार्‍यांना कोविड भत्ता देखील दिला जाईल असं सांगण्यात आले आहे. आज भायखळा येथील महापौर बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांचीही दिवाळी बीएमसीने गोड केली आहे.

काल (3 नोव्हेंबर) मुंबई मध्ये मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बेस्ट कर्मचार्‍यांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेली चर्चा सकारात्मक असल्याने आज पालिकेकडून बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस जाहीर केला आहे. दरम्यान सध्या कोविड संकट काळात मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईकर आता मास्क परिधान करून बेस्ट बस प्रवास करू शकतात. Diwali Bonus: मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत मिळणार 'एवढा' बोनस.

काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगर पालिकेने पालिकेच्या कर्मचार्‍यांसाठि यंदा दिवाळी बोनस हा 15 हजार 500 रूपये जाहीर केला आहे. केंद्र सरकारनेही त्यांच्या नॉन गॅझेट कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. Diwali Special : दिवाळी बोनस देण्याची प्रथा अशी झाली सुरू.

दरम्यान आजपासून मुंबई मध्ये बेस्ट बस चाल्क, वाहक आणि अन्य कर्मचार्‍यांना जेवणाऐवजी 200 रूपये अग्रीम देण्याचं जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत परशहरातून येणार्‍या एसटी कर्मचार्‍यांच्या जेवणात अळ्या सापडल्याच्या तक्रारी आल्या होत्या.